सौजन्या लोकसत्ता

प्री-स्कूलच्या ‘प्रोफेसर्स’
त्या दोघी वेगवेगळ्या वयाच्या, खरं तर वेगवेगळ्या पिढीच्या!

|| वेदवती चिपळूणकर

त्या दोघी वेगवेगळ्या वयाच्या, खरं तर वेगवेगळ्या पिढीच्या! पण त्यांच्यात मैत्री झाली आणि कॉमन आवडीतूनच दोघींनीही नोकरी सोडायचा निर्णय घेतला. इतकी वर्ष नोकरी करूनही मनाचं समाधान मिळत नाही असं सोनिया गोवर्धन यांना वाटत होतं. तरुण मुलांपेक्षा लहानग्यांना शिकवणं अधिक इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंगही होतं. वाडियासारख्या कॉलेजमधली प्रोफेसरची नोकरी सोडून सोनियाताईंनी आणि करिअरच्या सुरुवातीलाच वेगळा विचार करणाऱ्या जुई बिजापूरकर हिने आपली सर्व बौद्धिक शक्ती पणाला लावून नवीन प्रोजेक्टमध्ये जीव ओतला. कॉलेज सोडून दोघींनी प्री-स्कूल सुरू केले. सुरुवातीला मुलं येतायेत की नाही अशी शंका असलेलं प्री-स्कूल तीन वर्षांत पालकांमध्ये प्रसिद्ध झालं. इतक्या लहान वयात मुलांनी केलेली प्रगती पाहात असताना प्री-स्कूलच्या पुढची शाळाही सुरू करा असा आग्रह पालकांकडून धरला जाऊ लागला आणि ‘याचसाठी केला होता अट्टहास’ अशी समाधानाची भावना दोघींनाही जाणवली.

कॉलेज सोडून प्री-स्कूल सुरू करण्याच्या कल्पनेच्या मुळाशी असलेला विचार मांडताना सोनियाताई म्हणाल्या, ‘‘माणसाच्या मेंदूची वाढ ही वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंतच होते. त्यामुळे नवीन गोष्टींची आवड त्याच वयात निर्माण करणं सोपं असतं. तरुण मुलांना शिकवण्यापेक्षा लहान मुलांमध्ये रमण्यातही मजा आहे आणि सगळे संस्कार, सगळ्या सवयी, आवडी, शिस्त हे लहान वयातच मुलांमध्ये निर्माण करता येतात. त्याच वयात त्यांना अभ्यास, खेळ, भाषा, अभ्यासाचे विषय अशा गोष्टींची गोडी लावणं गरजेचं असतं. त्यामुळे प्री-स्कूल सुरू करण्यातच आम्हांला आमचं उद्दिष्ट दिसत होतं.’’ तर जुई म्हणते, ‘‘लहान मुलांवर काम केलं पाहिजे असं मलाही वाटत होतं. त्यामुळे ही कल्पना मलाही खूप आवडली. मुलांना वळण लावतानाच चांगले प्रशिक्षित शिक्षक तयार करणं हेही खूप महत्त्वाचं आहे असं आमचं मत होतं. लहान मुलांना हँडल करणं वाटतं तितकं सोपं नसतं. त्यामुळे त्यासाठी काही विशिष्ट स्किलसेट असावे लागतात आणि ते प्रत्येकाला अंगभूत असतातच असं नाही. त्यामुळे शिक्षकांना ट्रेन करणं हेही आम्हाला तितकंच गरजेचं वाटलं. त्यामुळे केवळ प्री-स्कूल नव्हे तर त्याचसोबत शिक्षकही तयार करायचे हे आमचं उद्दिष्ट आहे.’’

कॉलेजमधली नोकरी सोडून लहान मुलांना शिकवण्यात पैसे कितीसे मिळणार, त्यातून तुम्हाला काय मिळणार, कशासाठी सुखाचा जीव दु:खात अशा धाटणीचे अनेक प्रश्न दोघींच्याही समोर अनेकदा आले. मात्र या दोघी मैत्रिणी आपल्या निर्णयावर ठाम होत्या. करिअरला आत्ता कुठे सुरुवात होते आहे अशा टप्प्यावर जुईने हा निर्णय घेतला होता. त्याबद्दल जुई म्हणते, ‘‘करिअरच्या अगदी सुरुवातीलाच मी हा निर्णय घेत होते, लग्नही नुकतंच झालं होतं. सगळे कसे रिअ‍ॅक्ट करतील?, असा प्रश्न मला पडला होताच. मात्र कोणालाही त्यात काही वावगं वाटलं नाही. घरच्या सगळ्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. केवळ मानसिक किंवा भावनिक पाठिंबा नाही तर आर्थिक पाठिंबाही घरच्यांनी दिला. शाळेसाठी लागणाऱ्या भांडवलात त्यांची खूप मोठी मदत झाली आहे, खरं तर सगळं त्यांनीच केलं आहे. त्यामुळे माझ्या निर्णयावर ठाम राहणं मला शक्य झालं.’’ सोनियाताईंची कथा आणखी निराळी! वाडिया कॉलेजमध्ये प्रोफेसर, सगळ्या शासकीय सुट्टय़ा, कोणालाही आवडतील असे वìकग अवर्स अशा सगळ्या गोष्टी सोडून पूर्णवेळ द्यावा लागणारा एखादा स्वत:चा उद्योग थाटायचा म्हणजे लोकांसाठी नवलाचीच गोष्ट होती. मात्र लहान मुलांना शिकवण्याचा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काहीतरी करण्याचा त्यांचा निश्चय पक्का होता. मुलांना ‘माणूस’ म्हणून घडवण्यासाठी त्यांचं कोवळंच वय योग्य असतं हे त्यांचं ठाम मत होतं. आपण या क्षेत्रात नक्कीच काही चांगलं करू शकतो, या विश्वासाच्या आणि घरच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी नोकरी सोडली. दोघींनीही संपूर्णपणे स्वत:ला या शाळेच्या कामात झोकून दिलं.

आजूबाजूला अनेक प्री-स्कूल चालू होतात आणि दोन-तीन वर्षांत बंदही होतात. आपल्याला आपली शाळा तशी होऊ द्यायची नाही या विचारावर दोघीही ठाम होत्या. स्वत:च्या निर्णयाबद्दल जराही शंका न येणाऱ्या किंवा फेरविचार न करणाऱ्या त्या दोघींना पहिल्या वर्षी जेव्हा सुरुवातीला एकाच मुलाची अ‍ॅडमिशन झाली तेव्हा मात्र जरासं टेन्शन नक्की आलं होतं. पण जूनला शाळा सुरू होईपर्यंत चौदा अ‍ॅडमिशन झालेल्या होत्या. त्यामुळे २०१६च्या जूनमध्ये आनंदाने आणि उत्साहाने त्यांच्या शाळेचं पहिलं वर्ष सुरू झालं. तीन वर्षांत त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढून ८६ पर्यंत जाऊन पोहोचली. शिक्षक-शिक्षिका, इतर स्टाफ या सगळ्यांच्या मेहनतीवर ‘बीमिश प्री-स्कूल’ तीन वर्षांपासून हळूहळू घट्ट पाय रोवते आहे.

तीन वर्षांनी आपल्या निर्णायक क्षणाकडे वळून बघताना दोघी समाधान व्यक्त करतात. ‘या प्री-स्कूलमध्ये आमचं सगळं बेस्ट पणाला लागतं. त्यामुळे संपूर्ण क्षमता आजमावून काम केल्याचं समाधान मिळतं’, सोनियाताई म्हणतात, ‘‘लहान मुलांमध्ये रमण्यात वेगळं सौंदर्य आहे. आमच्याकडे परीक्षा होत नाहीत. आम्ही मुलांचे फोटोज आणि व्हिडीओज काढतो. त्यामुळे पालकांनाही आपल्या मुलाची प्रगती याचि देही याचि डोळा पाहिल्याचं समाधान मिळतं आणि आम्हालाही पुन्हा पुन्हा त्यांचं निरीक्षण करून नोंदी करता येतात. परीक्षा ही पद्धत शैक्षणिक आयुष्यात पुढे येणारच असते. त्यामुळे ते इतक्या आधीपासून मुलांवर थोपवावं असं आम्हांला वाटत नाही.’’ ‘‘लहान मुलांना शिकवून, त्यांच्यासोबत राहून, त्यांच्यात चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न करताना मिळणारं मानसिक समाधान अवर्णनीय असतं,’’ असं जुई म्हणते. ‘आर्थिक फायदा किती होतोय ही नंतरची बाब आहे. मनाला जो आनंद मिळतो तो शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सुरुवातीच्या काळात महिन्याला जास्तीत जास्त पाच हजारच मिळू शकत होते, पण तरीही आम्ही समाधानी होतो. आता आमची आर्थिक स्टेबिलिटी अगदी व्यवस्थित आहे. मात्र या सगळ्यावर मात करतो तो लहान मुलांच्यात वावरण्याचा आनंद!’, हे सांगताना तिच्या शब्दांतूनही तो आनंद झळकतो.

‘बीमिश प्री-स्कूल’ सध्या पुण्यात कार्यरत आहे. त्याचा विस्तार करण्याचा मानसही दोघींनी व्यक्त केला. लहान वयापासून फॉरेन लॅंग्वेजची ओळख, फोनिक्सच्या माध्यमातून भाषेचं शिक्षण, टीमवर्कचं शिक्षण, खुलेपणाने झाडाखाली बसून म्हटली जाणारी गाणी अशा सगळ्या गोष्टींनी मुलांचा आनंद तर वाढतोच, मात्र त्याचबरोबर त्यांच्या भविष्याचा पाया भक्कम करण्याचं जुई आणि सोनियाताई यांचं स्वप्न आहे. त्यासाठी आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रातल्या गावागावांतल्या मुलांना फोनिक्सच्या माध्यमातून इतर भाषा शिकवून त्यांच्यातली इंग्रजीची भीती घालवायचे प्रयत्न करावेत, असं त्यांचं लॉंग टर्म ध्येय आहे.